मिरज समतानगर येथील व्यक्तीचा मृत्यूःमहापालिका क्षेत्रात 79 जण बाधित :एनडीआरएफचा जवान पॉझिटिव्हः तब्बल 90 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्हय़ात कोरोनाचे विक्रमी 106 रूग्ण वाढले आहेत. तर तब्बल 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 1214 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 538 आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 79 रूग्ण आढळून आले आहेत. सांगली शहरातील एकाच घरातील सात जणांचा त्यामध्ये समावेश आहे. मिरज समतानगर येथील एकाचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळी गेल्याची संख्या 42 झाली आहे.
सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे.बुधवारी सांगली आणि मिरज दोन्ही शहरात मिळून 79 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सांगली शहरात यामध्ये 63 रूग्ण वाढले आहेत. शहरातील विविध भागात हे रूग्ण आहेत. सांगली शहरात मोठय़ाप्रमाणात तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हे रूग्ण आढळून येत चालले आहेत. खणभागात एकाच घरातील सात जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खणभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरज शहरात 16 नवीन रूग्ण वाढले आहेत. शहरातील विविध भागतील हे रूग्ण आहेत.
शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी, मिरज, खानापूर तालुक्यात रूग्ण वाढले
शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे मुंबईहून आलेली 50 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. वाळवा तालुक्यातील रोझावाडी येथे एक जण बाधित आढळून आला तर आष्टा येथे एनडीआरएफचा जवान बाधित झालेला आहे. तर शिगाव येथील एकजण बाधित आढळून आला आहे. कडेगाव तालुक्यातील शाळगाव येथील 23 वर्षीय युवक, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे एक महिला आणि एक युवक बाधित झाला आहे. तर तडवळे येथे एकजण बाधित आढळून आला आहे. जत तालुक्यातील पाचजण बाधित आहेत. त्यामध्ये जत येथील तीन, अंसगी तुर्क येथील एक जण बाधित आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे एकजण आणि भोसे येथे दोनजण, कसबे डिग्रज, दुधगाव, समडोळी, माधवनगर येथे प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. खानापूर तालुक्यातील विटा शहरात दोन महिला आणि एक व्यक्ती तर मादळमुठी येथे दोन महिला आणि एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे.
मिरजेतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
कोरोनाचे उपचार सुरू असताना बुधवारी मिरज शहरातील समतानगर येथील 57 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील बळीची संख्या 42 वर पोहचली आहे. सलग आठ दिवस जिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया व्यक्तीचा कोरोनाने बळी चालला आहे.
तब्बल 90 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात बुधवारी विक्रमी 106 रूग्ण वाढले असले तरीसुध्दा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे जिल्हय़ातील उपचार सुरू असणारे 90 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला असून आता त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे ही गोष्ट जिल्हय़ाला दिलासा देणारी ठरली आहे. पण उपचार सुरू असणाऱया 13 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 1214
बरे झालेले 634
उपचारात 538
मयत 42