प्रतिनिधी / सांगली
उच्च न्यायालय मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशास अनुसरून उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रिट पिटीशन नंबर २८९९/२०२१ अन्वये जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे उमराणी येथील रिट पिटीशन २८९९/२०२१ दाखल झालेले असल्याने जत तालुक्यामधील दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या सर्व सरपंच/उपसरपंच निवडीच्या प्रथम सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश पारित केले आहेत. सदर प्रकरणी आदेश पारित झाल्यानंतर जत तालुक्यामधील सर्व सरपंच/उपसरपंच निवडीबाबतच्या प्रथम सभा घेण्याबाबतचे आदेश स्वतंत्र्यरित्या पारित करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जारी केले आहेत.
तसेच सांगली जिल्ह्यामधील इतर तालुक्यामधील सरपंच/उपसरपंच प्रथम सभा निर्धारीत केलेल्या दिनांकास जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. १ फेब्रुवारी २०२१ अन्वये देण्यात आलेल्या आदेशानुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात याव्यात व त्याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील १० तालुक्यामधील नुकत्याच पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतीची सरपंच/उपसरपंच निवडणूकीची सभा. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्याबाबत व सदरची प्रक्रिया प्रशासकियदृष्ट्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती करण्याकामी सर्व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील दि. ५ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे व नाशिक या सहा जिल्ह्यामध्ये सरपंच आरक्षणासंदर्भात ३१ रिट पिटीशन दाखल झालेले आहेत. सदर रिट पिटीशनच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या आदेशामध्ये दि. ८ ते ११ फेब्रुवारी २०२१ दरम्यान होणाऱ्या सरपंच निवडीबाबतच्या सभा दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत न घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.