नगराध्यक्षा शुभांगी बन्नेवार यांचा आरोप
राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भाजपला घेवून उद्घाटने परस्पर केली जात असल्याचाही केला आरोप
प्रतिनिधी / सांगली
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आहे. पण जत नगरपालिकेमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि भाजपची अभद्र युती झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे आणि भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप जत नगरपालिकेची विकासकामांशी त्यांचा काहीही संबंध नसताना ते परस्पर उदघाटन करत असल्याचा आरोप नगराध्यक्षा शुभांगी बन्नेवार यांनी केला. जतचे आमदार विक्रम सावंत यांच्यावर बेछुट आरोप करून हे दोन्ही नेते स्वतःचीच किंमत कमी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बन्नेवार यांनी बाजार समितीचे माजी सभापती आप्पाराया बिरादार, बाबासाहेब कोडग यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार बैठकीत हे आरोप केले.
शुभांगी बन्नेवार म्हणाल्या, आमदार विक्रम सावंत यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर केलेल्या विकासकामांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे आणि भाजपाचे आमदार विलासराव जगताप हे करत आहेत. तरीही ते काँग्रेसवर आरोप करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नेत्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनीच रोखावे, असे आवाहन बन्नेवार यांनी केले.
आप्पा बिरादार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची एकत्रित सत्ता आहे. पण जतमध्ये मात्र राष्ट्रवादी विरोधी पक्ष भाजपबरोबर एकत्रित काम करत आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यातून राज्यात चुकीचा संदेश जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार विक्रम सावंत यांच्यावर शिंदे आणि जगताप चुकीचे आरोप करत आहेत. हे आरोप करताना त्यांनी कोणते काम कोणी मंजूर केले याची तर माहिती घ्यावी असेही सांगितले किंवा राष्ट्रवादी पक्षात विलासराव जगताप आले आहेत का, सुरेश शिंदे भाजपमध्ये गेले आहेत हे तरी जनतेसमोर स्पष्ट करावे.
विक्रम सावंत यांची ईडीमार्फत चौकशीची मागणी ते करत आहेत. पण ईडी काय असते ती किती रक्कमेच्यावर अपहार झाल्यावर चौकशी करते याचीतर थोडी माहिती त्यांनी घ्यावी, असेही आवाहन केले. तसेच जर चौकशी करायची असेल तर त्यांनी जत कारखान्यामध्ये जो गैरव्यवहार झाला त्यावेळेपासूनची माजी आमदार विलासराव जगताप यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँगेसचे जिल्हाध्यक्षपद मिळाले तर आनंद
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांना जर संधी मिळाली तर आनंदच होईल. त्याच्या नावासाठी कोणतीही मागणी आपण केली नाही. कोणीही जिल्हाध्यक्ष झाले तरी त्यांच्या पाठीशी जत मधील काँग्रेस निश्चितपणे उभी राहिल असेही बिरादार यांनी सांगितले.








