प्रतिनिधी/जत
जत नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष, माजी सरपंच तथा विद्यमान नगरसेवक, जेष्ठ नेते इक्बाल उर्फ पटुभाई मौला गवंडी (वय 58) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गवंडी हे गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते, त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, सोमवारी दुपारी त्यांची उपचारा दरम्यान प्राणजोत मावळली,
इक्बाल गवंडी हे गेली 35 वर्षे जत शहराच्या राजकारणात सक्रिय होते. माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या सोबत त्यांनी शहर व तालुक्यात राजकारण, समाजकारण केले. जत शहरातून ते सलग 30 वर्षे निवडून येत होत. सद्या ते पालिकेचे विद्यमान नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते म्हणून काम करत होते. त्यांनी तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच, पालिकेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आदी पदांवर काम केले होते, या काळात त्यांनी जत शहरात अनेक विकासकामे केली, जत शहराची खडानखडा माहिती असणारे ते एकमेव नेते होते
तसेच गवंडी यांना मुस्लिम समाजाचे नेते म्हणून तालुकाभर ओळखले जात होते, राजकारणातील धुरंदर नेते अशी खास ओळख होती, जिल्हा आणि तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, त्यांच्या आकस्मिक निधनानंतर तालुक्यातील एक अजातशत्रू नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
Previous Articleविक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला
Next Article ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु








