कोरोनाच्या भीतीने लोकांचा निसर्गाच्या सानिध्यात मुक्काम
रमेश मस्के / वार्ताहर
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे ठाळेबंदी झाल्याने अनेकजण शहरातुन गड्या आपला गाव बरा… म्हणत गावाकडे आले… मात्र कोरोनाचा विळखा शहराबरोबरच ग्रामीणभागात ही वाढू लागल्याने गावातील अनेक लोक संसर्गाच्या भीतीने गड्या आपलं शेतचं (मळा) बरं.. म्हणून शेताकडे धाव घेत आहेत. अनेकांनी निसर्गाच्या सानिध्यात शेतातल्या वस्तीवर मुक्काम ठोकले आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातल्या धावत्या जीवनाला लॉकडाऊनमुळे जणु ब्रेकच लागला आहे. पण हा ब्रेक कोरोना विषाणूची संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी आहे. आत्ता व्यवसाय काही उद्योगधंदे बंद असल्याने अनेक जणांनी गावाकडे धाव घेतली. मात्र शहरांबरोबर गावेही कोरोनाच्या संकटात सापडली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ व मृत्युदर पाहता ही चिंतेची बाब बनली आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट गंभीर असल्याने झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना गावांसह गल्ली तर अनेकांच्या शेजारी, घरात येवुन पोहोचला आहे. त्यांचा संसर्ग आपल्याला होऊ नये याची अनेकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे ज्यांना शेत जमीन आहे असे लोक कोरोनाच्या भीतीने शेतीकडे धाव घेत आहेत. कोरोनाबाधितांशी संपर्क येऊ नये यासाठी दिवसभर शेतामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत आहेत. ज्यांना शेतामध्ये राहण्याची सोय आहे अशांचा तर आता मुक्कामच शेतातील वस्तीवर होत आहे. त्यामुळे कायम गजबजलेल्या रस्त्यांवर व गल्लीतून लॉकडाऊनमुळे शुकशुकाट पसरून रस्ते अबोल झाले आहेत. अनेक लोक शेतातील कामात व्यस्त राहुन निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत.
शेतातून गावाकडे… आत्ता गावातून शेताकडे धाव…
पूर्वी अनेक लोक शेतातल्या वस्तीवर राहण्यासाठी होते मात्र अनेक सोयी सुविधा गावात उपलब्ध होत गेल्याने धावपळीच्या जीवनात अनेक जण शेतातून गावाकडे राहण्यास आले. मात्र सध्या कोरोनाच्या भीतीमुळे पुन्हा गावाकडून शेतातल्या वस्तीवर राहण्यास जात आहेत.

व्यायामाची ही लागली सवय….
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायामाची सवय लावुन घेत आहेत. शेतासह घरात सकाळ- संध्याकाळी लोक व्यायाम करीत असुन आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व उपाय-योजना करीत आहेत.








