प्रतिनिधी / विटा
खानापूर विधानसभा मतदारसंघात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खानापूर, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलमधील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विटा, आटपाडी आणि करंजे येथील ग्रामीण रुग्णालयांना निधी देण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी याना पत्र दिले आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोरोना रुग्णावर उपचारासाठी आवश्यक उपकरणे घेण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार बाबर यांनी या पत्रातून केली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यातून सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्शवभूमीवर आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार बाबर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून अत्यावश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. खानापूर, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल मध्ये एकूण अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर विटा, आटपाडी आणि करंजे येथील ग्रामीण रुग्णालयांतुन देखील कोरोना रुग्णावर उपचार सुरु आहेत. मात्र या दवाखान्यातून वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. त्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी शिफारस पत्र दिले आहे.
करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दहा, मल्टि पॅरा मॉनिटर दहा आणि जनरेटर यासाठी निधी देण्याची मागणी आमदार बाबर यांनी केली आहे. आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पाच, मल्टि पॅरा मॉनिटर पाच आणि जनरेटर यासाठी तर विटा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दहा, मल्टि पॅरा मॉनिटर दहा, संगणक आणि जनरेटर यासाठी निधी देण्याची मागणी आमदार बाबर यांनी केली आहे.
याशिवाय मतरसंचातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील आरोग्य उपकरणे देऊन सक्षम करण्यासाठी आमदार बाबर यांनी मागणी केली आहे. यानुसार विटा आणि आटपाडी येथे प्रत्येकी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि तीन मल्टि पॅरा मॉनिटर तर वेजेगाव, लेंगरे, खानापूर, दिघंची, करगणी, खरसुंडी, मांजर्डे, बोरगाव आणि हतनूर येथील आरोग्य केंद्रांना प्रत्येकी तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि दोन मल्टि पॅरा मॉनिटर देण्यासाठी आमदार बाबर यांनी पत्र दिले आहे. या सर्व उपकरणांच्या खरेदीसाठी आमदार बाबर यांनी त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची शिफारस केली असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आमदार बाबर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.








