खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील भडकेवाडी घाटात एस. टी. महामंडळाच्या दोन बसवर दगडफेक प्रकरणी दोघांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश जगन्नाथ कदम (रा. भडकेवाडी,ता. खानापूर) आणि पवन गणपत भवर (रा. विजयनगर,ता. तासगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मागील महिन्या भरापासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा बंद करत संप पुकारला होता. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर सरकारशी तडजोड झाल्यानंतर काही जण संप टाळून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर काही जण अद्यापही संपात सहभागी आहेत. परिणामी संपकऱ्यांमध्ये फूट पडली आहे. यातूनच आता संप करणारे आणि कामावर आलेल्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. मात्र याचा गैरफायदा काही समाजकंटक लोक घेताना दिसत आहेत. काल शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनेत विटा आगाराच्या तासगाव ते खानापूर (गाडी नंबर एम एच २० – बी एल११४२) आणि विटा ते भिवघाट (गाडी नंबर ४० एन ८५९४) या दोन गाड्यांच्या काचा गणेश जगन्नाथ कदम आणि पवन गणपत भवर दोघांनी फोडल्या आहेत. चालक आणि वाहक तसेच प्रवाशांच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जे. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एल. एम.गुरव, एम व्ही खिलारे, एस डी खुबीकर, एम. टी. कांबळे यांनी कारवाई केली आहे.









