संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास कारवाई
प्रतिनिधी / सांगली
सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार सर्दी, ताप व इतर कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्य रूग्ण विभागात उपचाराकरिता येतात. अशा कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरटीपीसीआर अथवा ॲन्टीजन टेस्ट करण्याकरिता संदर्भित करावे. जेणेकरून कोविड बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करून रूग्णांचा SpO2 मेंनटेन करता येईल व संभाव्य मृत्यू टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
संशयित कोविड रूग्ण कोविड तपासणी न करता किरकोळ उपचाराकरिता इतरत्र फिरत असल्याने कोविड संसर्गाचा प्रसार वाढत असून अशा रूग्णांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला कळविण्यासाठी गुगल शीट तयार करण्यात आली आहे.








