प्रतिनिधी / आटपाडी
महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले खरसुंडी येथील श्री सिध्दनाथ देवाचे मंदिर कोरोना महामारीत पाच महिने बंद आहे. सदरचे मंदिर खुले करावे, अशी मागणी करत भाजपच्या वतीने मंदिराच्या प्रवेशदाराबाहेर घंटानाद करण्यात आला.
आमदार गोपीचंद पडळकर, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव काळेबाग, भाऊसो कमळधरणे, धोंडीराम इंगवले, किशोर पुजारी, तानाजी क्षीरसागर, स्वप्निल जाधव, रवी पुजारी, युवराज पुजारी, किरण पुजारी, बिलास जानकर, राजु शेख यांच्यासह पुजारी, स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत खरसुंडीतील श्री सिध्दनाथ देवस्थान भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन कोरोनाचा महाराष्ट्रातील संसर्ग वाढला आहे. तो आजतागायत तसाच सुरू आहे. सांगली जिल्लयात कोरोनाबाधितांची संख्या १०हजाराचा आकडा पार करून पुढे जात आहे. आटपाडी तालुक्यात ही आकडेवारी ४२५च्या घरात आहे. राज्यातील अन्य धार्मिक स्थळांप माणेच आटपाडी तालुक्यातील खरसुडीतील सिध्दनाथ मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमि असणारे सासनकाठी व पालखी सोहळाही चालुवर्षी रद्द झाला.
खरसुंडी सिध्दनाथ मंदिर बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारी पुजारी, लहान व्यापारी, व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. अशावेळी सिध्दनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी भाविकासह भाजपने केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंदिरासमोर घंटा वाजवून दार उघड उद्धवा, दार उघड अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.








