प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांती उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजला आत्त्याधुनिक असे एच.एफ.एन. सी.आय. 7 या उपकरनाचे तीन संच प्रदान करणेत आले.
महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी कोरोना हॉस्पिटल उभारून कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहन खा. शरदचंद्र पवार केले होते. त्याला प्रतिसाद देत क्रांती उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड यांनी हे उपकरण मिरज येथील जिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे प्रदान केले.
कोरोना रुग्णांना 100% ऑक्सिजन 80 लिटर प्रति मिनिट दराने आद्रता वाढवून, रुग्णाचे तापमान नियंत्रित करून उच्च ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी व रुग्णाच्या फुफुसावरील ताण कमी होऊन प्रकृती लवकर सुधारण्यासाठी “हेअर” या जर्मन कंपनीने बनवलेले हे आत्त्याधुनिक उपकरण खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणेसाठी या उपक्रमाची जिल्हा रुग्णालयाला गरज होती म्हणून 11 लाख 76 हजार 800 रुपये किंमतीचे तीन संच प्रदान करण्यात आले.
अरुण अण्णा लाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, क्रांतीचे उपाध्यक्ष अनंत जोशी, जिल्हापरिषद सदस्य शरद लाड, डॉ.सुधीर नानंदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी.एस. गिरीगोसावी, डॉ. संजय साळुंखे, संजय बजाज, राहुल पवार यांच्या उपस्थितीत रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.
कोरोनाच्या काळात क्रांती उद्योग समूहाने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यातच क्रांती सहकारी साखर कारखान्याने अनेक गावांमध्ये सॅनिटाइझर, मास्क अनेक गावातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, कोरोना योद्धा, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी आणि लोकांना मोफत वाटप केले आहे. तसेच पलूस कडेगाव मतदारसंघातील अनेक गावात आर्सेनिक आल्बम 30 या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप हि केले आहे. अनेक गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली आहे.








