सांगली/प्रतिनिधी
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये आलेल्या महापुराने मोठी हानी झालेली होती. सांगलीमध्ये 2021 ला पुन्हा महापूर आला. महापुराची दोन्ही जिल्ह्यावर टांगती तलवार कायम असून राज्य शासनाने येत्या पावसाळ्यापूर्वी याबाबत उपाययोजना न केल्यास 15 मे नंतर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली.
कृती समितीचे विजयकुमार दिवाण, माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी शुक्रवारी सांगलीत ही माहिती दिली. महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने 2006 मध्ये नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने 2007 मध्ये आपला अहवाल सादर केला शासनाने हा अहवाल 2011 मध्ये स्वीकारला. पण याबाबत शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कृती समितीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून आपला अहवाल तयार केला आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत धरणातील पाणीसाठा दहा टक्के तर जुलै अखेर 50 टक्के ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणी आणि त्याचा विसर्ग त्या व नियोजन केल्यास महापुराचा धोका कमी होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.