प्रतिनिधी / सांगली
गतवर्षीच्या महापुराने सांगली कोल्हापूर जिह्याचे फार मोठे नुकसान झाले. पिके वाहून गेली. शेती बुडाली,घरे पडली. भविष्यात अवेळी अतिवृष्टी हे कटूसत्यच आहे. त्यामुळे या दोन्ही जिह्यासाठी महापुराचे विशेष पॅकेज मिळणार असल्याची माहिती सहकार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. तर कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये जबाबदार व्यक्तीही सहभागी असल्याचे पोलिसांचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. यातील एकाही दोषीला सोडणार नाही. शासन कडक कारवाई करेल, असा इशाराही डॉ. कदम यांनी दिला.
बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले, महापूर असो अथवा दुष्काळ प्रत्येक वेळी डॉ. पतंगराव कदम झपाटून काम करायचे. त्यांचाच वारसा आणि प्रेरणा घेऊन आपण गतवेळच्या महापुरात काम केले. महापुरातील लोकांना मदत केली. पण, या महापुराचा फटका सांगली आणि कोल्हापूर जिह्याला मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. शेती, घरांचे कोटय़वधीचे नुकसान झालेच. पण, छोटे पूल आणि गावांना जोडणारे रस्ते अपूरे असल्याने गावेच्या गावे पाण्यात अडकली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे इस्लामूर दौऱयावर असताना आपण आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली. महापुरात बोटी हव्यातच. पण, रस्ते आणि पुलासारख्या पायभूत सुविधाही कायमस्वरूपी निर्माण करणे आवश्यक आहे. सांगली जिह्याचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी पाठवला आहे. या दोन्ही जिह्यांचा महापुराचा धोका कायमस्वरूपी टाळण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली.
त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन्ही जिह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे या दोन्ही जिह्यासाठी वेगळे पॅकेज देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही डॉ. कदम यांनी दिली.
कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी शासन कोणालाही सोडणार नाही
कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी बोलताना डॉ. कदम म्हणाले, हा घोटाळा गंभीर आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही जबाबदार व्यक्तीही यामध्ये सहभागी असल्याचे पुढे आले आहे. तपास आणि गुन्हे दाखल झाले त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता लोकांचे सरकार आले आहे. यामध्ये कोणीही दोषी असू दे सरकार कारवाई करणारच. कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेत लक्ष घालणार, जिह्यात काँग्रेस वाढवणार
डॉ. कदम म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर आपल्यावर दडपण होते. तीन वर्षे आपण भावना दाबून काम करत होतो. 2019 ची विधानसभा निवडणूक आपल्या दृष्टीने महत्वाची होती. त्यामुळे अन्य कुठेही आपण लक्ष घातले नव्हते. पण, आता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत लक्ष घालणार आहे. शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पातळीवर सर्वतोपरी मदत करण्यात येईल. प्रशासनाच्या बैठका घेण्यात येतील.
जिह्याचे पालकमंत्रीपद काँग्रेसकडे असायला हवे होते
जिह्यात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहोत. पण, विकासाच्या बाबतीत ज्येष्ठ नेते पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या साथीने काम करू, असे सांगून डॉ. कदम म्हणाले, सांगली जिह्याचे पालकमंत्रीपद काँग्रेसकडे असावे. काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याला पालकमंत्रीपद मिळावे, अशी आपली मागणी होती. कोल्हापूरचे पालकमंत्री पद सतेज पाटील यांच्याकडे राहणेच योग्य होते. आपण कोल्हापूरसाठी कधीच मागणी केली नव्हती. तीन पक्षांच्या आघाडीच्या शासनामध्ये चर्चेत मागेपुढे झाले. सांगलीचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले. तो निर्णय आपण मोठय़ा मनाने स्वीकारला आहे. भंडारा जिह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.
भंडारा जिह्याचे पालकमंत्रीपद म्हणून काम करताना पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे नाते अधिक दृढ करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेणार
स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्यात पाणी अडवा पाणी जिरवा योजना सुरू केली आणि प्रभावीपणे राबविली. पण, गत सरकारने या योजनेचे नाव जलयुक्त शिवार केले. आमची त्याला काहीच हरकत नाही. पण, या योजनेच्या कामांबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. त्यामुळे आपण या योजनेचा आढवा घेत असून कामे झालेल्या ठिकाणी शेती आणि शेतकऱयांना काय लाभ झाला. पाणी पातळीत काय फरक पडला. टँकर बंद झाले का आदीसंदर्भात आढावा घेऊन योजनेबाबत निर्णय घेणार असल्याचेही मंत्री डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी डॉ. कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.








