प्रतिनिधी / इस्लामपूर
कोरोना रुग्णांची वाढ व मृत्यूदर यामुळे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीत सर्वच अधिकाऱ्यांना झापले. चुकीचे उपचार करणाऱ्या, जादा खर्च घेणाऱ्या आणि हॉस्पिटलमधील दर, बेडस माहिती फलक न लावणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
पाटील हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नेहमीच आदर करतात. समन्वयाने ते अनेक प्रश्नांचा निपटारा करतात. पण गेल्या काही महिन्यांत वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यात कोरोना परिस्थिती अधिक बिघडली आहे. रुग्ण दगावत आहेत. काही हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा, रुग्णांच्या मृत्यूबाबत व उपचार खर्चाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्यांच्यावर कुणाचे कसलेच नियंत्रण उरलेले नाही. गेल्या वेळच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी तक्रारी असणाऱ्या हॉस्पिटलचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. पण अशा काही हॉस्पिटलच्या चौकशीचा फार्स सुरु आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.








