कारखान्यातील धुराडीमुळे द्राक्षबांचे नुकसान, शेतकऱ्यांसोबत बैठक
वार्ताहर / सलगरे
केंपवाड कारखान्याच्या धुराडीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे द्राक्षबागांसह अन्य शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवावी, यासाठी कारखान्याचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना खराडे म्हणाले, केंपवाड कारखान्याची निर्मिती होवून दहा ते पंधरा वर्षे झाली. मात्र कारखान्याच्या धुराडीतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडत आहे. यामुळे द्राक्षबागांवर परिणाम होऊन घड काळे पडतात ही काळी पडलेली द्राक्षे माती मोल किमतीने शेतकऱ्यांना विकावी लागतात. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, जानराववाडी, संतोषवाडी आदी गावातील दोन हजार एकरवरील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यावेळी सरपंच मारुती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भरत चौगुले, शाखाध्यक्ष नंदू नलवडे उपस्थित होते.








