वार्ताहर / वसगडे
शेतकऱ्यांची खरीपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली असून जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले कृषी सेवा केंद्रांची दुकाने बंद आहेत. आजपासुन दुकानं ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रामध्ये सध्या शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके व टॉनिक मुबलक प्रमाणावर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरांमध्ये जाऊन शेतीमाल खरेदी करण्यास जावे लागत आहे, शेतकऱ्याला घरातील सर्व कामे जनावरांचा चारा-पाणी, धारा आवरून जाईपर्यंत दुकानं बंद झालेली आढळुन आली. तसेच कायदेशीर कारवाईच्या भीतीने आपली दुकाने दिलेल्या वेळेत बंद केल्यामुळे काही ठिकाणी कृषी दुकानदार व शेतकऱ्यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भभवले. तरी जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन तास वेळ वाढवून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदिप राजोबा यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला व द्राक्षे या पिकाकर दावण्या व भुरी यासारखे रोग पडत आहेत. आधीच भाजीपाल्याला दर नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ऊसाला लागणारे पावसाळी डोस तसेच फवारणीसाठी लागणारे मायक्रो न्यूटन व टॉनिक वेळेत मिळणे गरजेचे आहे. तशीच अवस्था द्राक्ष बागायतदारांचे सुद्धा आहे. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री जयंत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी लक्ष घालून वेळ वाढवावी अशी मागणी राजोबा यांनी केली आहे. तसे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा यावेळी राजोबा यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने खताच्या किंमतीमध्ये केलेली भरमसाठ वाढ तात्काळ रद्द करावी यासाठी माजी खा. राजू शेट्टी यांनी २० मे रोजी आंदोलन जाहीर केलेलं आहे. तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय, आपलं गाव, असेल आपलं घर असेल आपलं शेत असेल या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळुन केंद्र शासनाच्या या धोरणाचा पुतळा दहन करून निषेध करणार आहे. शेतकऱ्यांनी आप आपल्या परीने त्या पद्धतीने या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संदीप राजोबा यांनी केले आहे.








