कुपवाड / प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करून कुपवाड शहरातील १५ धोकादायक इमारत मालकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. त्यापैकी अति धोकादायक तीन इमारती बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
महापालिकेने कुपवाड शहरात धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला. यामध्ये १५ धोकादायक इमारती आढळून आल्या. पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारती स्वत:हुन उतरवून घ्या, याबाबतच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी इमारत मालकांना बजावल्या होत्या. यामध्ये अतिधोकादायक इमारती मालकांना ४८ तासांची तर धोकादायक इमारत मालाकांना ७ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली होती.
नोटीस मिळाल्यानंतर बहुतांश इमारत मालकांनी स्वत:च धोकादायक इमारती उतरवून घेतल्या. मात्र, ज्या इमारती उतरवून घेतल्या नाहीत, त्या महापालिका प्रशासनाकडून उतरवून घेण्याचे काम बुधवारपासून दिवसभर सुरू झाले. पहिल्यादिवशी महापालिका प्रशासनाने शहरातील तीन इमारती जमीनदोस्त केल्या.








