कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड शहर आणि परीसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ माजवला आहे. मंगळवारी रात्रीत चोरट्यांनी मोठ्या दुकानांवर डोळा ठेऊन फर्निचर शोरूम व किराणा अशी दोन दुकाने फोडल्याने खळबळ माजली आहे. यात खुद्द व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाचे शोरूम फोडल्याने शहरात चर्चेचा आणि पोलिसांसमोर आव्हानाचा विषय बनला आहे.
कुपवाडमधील मुख्य रस्त्यालगत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ यांचे ओंकार फर्निचर शोरूम व राणाप्रताप चौकातील बंडू सकनाटे यांचे भाग्यश्री ट्रेडर्स किराणा दुकान आहे. या दोन्ही दुकानाच्या डाव्या बाजूचा पत्रा एकाच पद्धतीने कापून आणि उचकटुन चोरट्यानी दुकानात प्रवेश करून दोन्ही दुकानातील रोख रक्कम २५ हजार २०० रुपये, मोबाईल व इतर साहित्य चोरुन चोरट्यानी पोबारा केला. एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांची रात्रीची गस्त कुचकामी ठरत असल्याचे जाणवू लागले आहे. दोन्ही चोरीच्या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. दरम्यान, दोन्ही ठिकाणचे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन्ही चोऱ्याही एकाच पद्धतीने झाल्याने संशयित चोरटे एकच असल्याचा पोलिसांचा संशय आहे.








