प्रतिनिधी / कुपवाड
चारित्र्याच्या संशयावरुन झालेल्या वादातुन चिडून पतीने पत्नी झोपेत असताना टॉवेलमध्ये मोठा दगड गुंडाळून तिच्या डोक्यात जोराने घाव घालून गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी तिचा मृत्यु झाला.
यामध्ये अर्चना रामचंद्र हाक्के (२८ रा.वाघमोडेनगर) असे पतीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. कुपवाडमधील वाघमोडेनगरमध्ये बुधवारी रात्री साडेआकराच्या सुमारास ही घटना घडली असून कुपवाड पोलिसांत याबाबत नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पती रामचंद्र विठोबा हाक्के (३५, रा.वाघमोड़ेनगर, मूळ शिंगणापूर) याला बुधवारी रात्रीच अटक करुन त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला दगड व टॉवेल जप्त केला आहे. रामचंद्र विरोधात मयत अर्चनाचा मावसभाऊ दशरथ यशवंत गडदे (३४, रा.वाघमोड़ेनगर, कुपवाड) यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच ऑगस्टपर्यंत सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाल्याने सुनावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रामचंद्र हाक्के याचा अर्चनासोबत १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याचा कुपवाड व मिरज एमआयडीसीत हमालीचा व्यवसाय आहे. तो पत्नी अर्चना, मुलगी वैभवी (११), वैष्णवी (९) व मुलगा मयूरेश (५) या तीन लहान मुलांसोबत गेल्या दीड वर्षांपासून वाघमोडेनगरमध्ये यशवंत गडदे यांच्या खोलीत भाड्याने राहत आहे. यापूर्वी त्यांच्यात वारंवार घरगुती वाद व किरकोळ कारणावरून वाद व्हायचा. तो पत्नीवर सतत चारित्र्याचाही संशय घेत होता. यातून पुन्हा वाद झाल्याने चिडून दोन महिन्यापूर्वी दोघेही आपआपल्या गावी गेले. पती रामचंद्र शिंगणापूर येथे गेला, तर पत्नी अर्चनाला आई वडील नसल्याने ती तिन्ही मुलांना सोबत घेऊन सलगरे येथे नातेवाईकाकडे गेली. चार दिवसांपूर्वी पत्नीची समजूत काढून वाद मिटवला आणि दोघेही मुलांना घेऊन मंगळवारी सायंकाळी वाघमोड़ेनगर येथे घरी परतले.
चारित्र्याच्या संशयावरुन बुधवारी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. काही वेळात वाद मिटला आणि सर्वजण सोबत जेवण करून झोपी गेले. अर्चनाला चांगली झोप लागल्याची खात्री करून संशयित रामचंद्र हाक्के याने रात्री साडेआकराच्या सुमारास टॉवेलमध्ये मोठा दगड गुंडाळून झोपेत असलेल्या अर्चनाच्या डोक्यात जोराने घाव घातला. यावेळी जीवाच्या आकांताने ती ओरडु लागली. पुन्हा जोराने घाव घातला. यावेळी वर्मी घाव बसल्याने डोक्यात प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत ती जागीच बेशुद्ध पडली. डोळ्यासमोर घटना पाहून त्यांच्या लहान मुलांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी ‘दरवाजा उघडा’ अशी हाक दिली. तरीही रामचंद्रने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी कुपवाड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हाक्के यास आम्ही पोलिस असल्याचे सांगून दरवाजा उघडण्यास भाग पाडले.
दरवाजा उघडून पोलिसांनी खोलीत प्रवेश केला. यावेळी अर्चना रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली होती आणि रामचंद जवळच उभा होता. तर मुले मोठ्याने रडत होती. पोलिसांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने तातडीने उपचारासाठी अर्चनाला जखमी अवस्थेत सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिसांनी संशयित रामचंद्रला ताब्यात घेवून घटनास्थळावरिल दगड आणि टॉवेलही जप्त केला. दरम्यान, उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी तिचा मृत्यु झाला. रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी रामचंद्र हाक्के विरोधात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी मिरजचे पोलिस उपाधीक्षक संदीपसिह गिल, सहायक निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. अधिक तपास सपोनि नीरज उबाळे करीत आहेत.
Previous Articleसातारा : 49 नागरिकांना दिला डिस्चार्ज; उपचारा दरम्यान 1 मृत्यू
Next Article दिघंचीत अतिक्रमणविरोधात आमरण उपोषण








