कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड शहरातील दुर्गानगर येथे सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास कुपवाड पोलिसांनी बुधवारी रात्री रंगेहाथ पकडून अटक केली आहे. यामध्ये पांडुरंग देविदास सावंत (वय २८,रा.दुर्गानगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील १ लाख ८४ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री कुपवाड – मिरज रस्त्यावरील गुलमोहर कॉलनी, दुर्गानगर भागात एक तरुण सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती सपोनि नीरज उबाळे यांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व तुषार काळेल यांसह पथकाने दुर्गानगर भागात सापळा लावला असता एकजण प्लास्टिक पिशव्यातून काही तरी घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला हाक मारून थांबवले.
पोलिस आल्याचे पाहुन तरुण हातातील गुटका व पान मसाला साठा रस्त्यावर टाकून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याला कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुठका व पान मसाला बेकायदा विक्रीसाठी आणल्याची कबूली दिली. त्याने आपले नाव पांडुरंग सावंत असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि त्याच्याजवळील मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.