प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 61 रूग्ण वाढले. तर 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या आता 902 झाली आहे. सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढतच आहे. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात 34 रूग्ण वाढले आहेत. तर कामेरी येथील पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तो मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळीची संख्या आता 26 वर पोहचली आहे.
महापालिकाक्षेत्रात 34 रूग्ण वाढले
सांगली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन 34 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 23 तर मिरज शहरात सहा रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरातील काळीवाट येथे 13, शिवाजीनगर येथे एक, कलानगर येथे एक, तर अरिहंत कॉलनी, चांदणी चौक, भारती हॉस्पिटल परिसर, अभयनगर, गणेशनगर, वानलेसवाडी, खणभाग लाळगे गल्ली, हरिपूर रोड याठिकाणी प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. मिरज शहरात 11 रूग्ण वाढले त्यामध्ये नदीवेस परिसरात चार, मिशन कंपौऊंड येथे एक आणि रमा उद्यान येथे एक रूग्ण वाढला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णांची संख्या आता 254 झाली आहे.
वाळवा, जत, मिरज तालुक्यात कोरोनाचा कहर
वाळवा तालुक्यातील कामेरी येथे नवीन दोन रूग्ण वाढले आहेत. हे दोन्ही रूग्ण मुंबईहून आले आहेत. तर पेठ, आष्टा आणि साखराळे येथे प्रत्येकी एक असे वाळवा तालुक्यात एकूण पाच रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात नऊ रूग्ण वाढले असून त्यामध्ये जत शहरात पाच, उमदी येथे दोन कोत्यवबोबलाद येथे एक गुलगुंजनाळ येथे एक असे रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात कवलापूर येथे दोन, बिसूर, अंकली, गुंडेवाडी, मालगाव येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथे एक, पलूस तालुक्यातील बांबवडे येथे एक, तासगाव शहरात एक असे रूग्ण वाढले आहेत.
कामेरी येथील पोलिसांचा कोरोनाने मृत्यू
वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱया 57 वर्षीय पोलिसांचा उपचारादरम्यान मिरजेत मृत्यू झाला आहे. ते सुट्टीसाठी गावी आले असता त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील बळीची संख्या आता 26 वर पोहचली आहे.
24 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 24 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, व्यंकोचीवाडी येथील 73 वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती, आगळगाव येथील 52 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील 44 वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय व्यक्ती, दरीबडीची येथील 28 वर्षीय युवक, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, उमदी येथील 40 वर्षीय व्यक्ती, कर्नाळ येथील 36 वषीय व्यक्ती, विश्रामबाग येथील 36 वर्षीय महिला, कलानगर येथील 65 वर्षीय व्यक्ती, सांगलीवाडी येथील 59 वर्षीय व्यक्ती कडेगाव येथील 70 वर्षीय व्यक्ती, या 14 जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील 10 रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
13 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शुक्रवारी 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या आता 443 इतकी झाली आहे. ही जिल्हय़ाला दिलासा देणारी बाब ठरली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 902
बरे झालेले 433
उपचारात 443
मयत 26








