वेगवेगळ्या बँक खात्यावरुन रक्कम हडपली, महिलेसह चौघांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
स्थावर मालमत्तेवर एचएचबीसी या बँकेकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून शहरातील नदीवेस, कुरणे गल्ली येथे राहणाऱ्या रमेश विरभद्र किवठे (वय ४९) या सराफ व्यवसायिकाला ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसांत धाव घेऊन एका महिलेसह चौघांविरुध्द फिर्याद दाखल केली आहे.
रमेश किवठे यांच्या फिर्यादीनुसार सचिन व्यंकटेश देशपांडे (रा. श्रीनाथकृपा, फ्लॉट नं. ६, पवार बंगला, शिवाजीनगर, मिरज), अजय पवार उर्फ अभिषेक भंडारे, श्रीमती प्रियांका शेट्टी (दोघे रा. मेंगलोर) आणि मिथुल कन्नूभाई त्रिवेदी (रा. भाटीया अपार्टमेंट, पार्क रेव्हेन्यू, कोटबागी हॉस्पिटल, लेन ३, औध, जि. पुणे) या चौघांवर मिरज शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर चौघांनी मार्च २०१८ ते जानेवारी २०२० या तीन वर्षात ३९ लाख, ८३ हजार, ९०० रुपयांची फसवणूक केल्याचे किवठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
रमेश किवठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मिरजेत राहणाऱ्या सचिन देशपांडे याच्यासह अन्य तिघांनी माझ्या मोबाईलवर बँकेचे खोटे एसएमएस पाठविले. त्यामध्ये एचएचबीसी या बँकेकडून स्थावर मिळकतीवर दीड लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले. या कर्ज प्रकरण मंजूरीसाठी प्रोसेसिंग फी म्हणून काही पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार मार्च २०१८ पासून जानेवारी २०२० पर्यंत माझ्या व मुलासह अन्य नातेवाईकांच्या बँक खात्यावरुन तसेच रोख रक्कमेच्या माध्यमातून वारंवार ३९ लाख, ८३ हजार, ९०० रुपयांची रक्कम घेतली. मात्र, आजतागायत कर्ज मिळाले नाही.








