प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यातील करगणी येथे रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सात दुकाने भस्मसात झाली. हार्डवेअर, भांडी, धान्य, पशुखाद्य, चहाची दुकाने आगीत खाक झाली. यामध्ये सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी पहाटे सहा वाजता ही आग पूर्णता आटोक्यात आणण्यात यश आले.
करगणी ग्रामपंचायतच्या समोरील बाजूस आटपाडी -भिवघाट रस्त्यालगत अनेक दुकान गाळे आहेत. रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अरुण पांढरे यांच्या हार्डवेअर दुकानात आग लागली. त्यालगत असलेले दिलीप सरगर यांच्या हार्डवेअर चे दुकान, नानासो पांढरे यांचे धान्य दुकान, पांडुरंग सरगर यांचे पेंडी चे दुकान, सूर्यवंशी भांडी सेंटर, अशोक पत्की यांचे पंढरपुरी चहाचे दुकान यांना आगिने वेढले. ही आग झपाट्याने विस्तारत गेली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सरपंच गणेश खंदारे यांनी तात्काळ मध्यरात्री आमदार अनिलभाऊ बाबर यांना संपर्क साधला. त्यानंतर विटा आणि तासगाव नगरपालिकेचे अग्निशामक वाहने दाखल झाली. गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सोमवारी पहाटे सहा वाजता आग आटोक्यात आली. त्यामुळे इतर दुकाने आगीपासून वाचवण्यात तरुणांना यश आले. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.








