प्रतिनिधी / कडेगाव
मूळ गाव सोहोली ता. कडेगाव असणाऱ्या व सध्या मुंबईत स्थायिक असणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन गरोदर महिलांपैकी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. दुसरी महिला व तिचे कुटुंब सोहोली या आपल्या गावाकडे बेकदेशीररित्या आले आहे. या कुटुंबातील गरोदर महिला, पती, सासू व सासरा यांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगिकरण केल्याची माहिती, कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे यांनी दिली.
डॉ. अशोक वायदंडे यांनी दिलेली माहिती अशी, सोहोली गावातील कुटुंब मुंबईत कुर्ला येथे वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दोन्ही मुले शेजारी शेजारी राहतात. या दोन्ही बंधूंच्या पत्नी गरोदर होत्या. प्रसूती अगोदर कोरोना टेस्ट घेतली जाते. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने त्या महिलेची टेस्ट घेतली होती. यात सध्या मुंबईत असणाऱ्या गरोदर महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरी गरोदर महिला, तिचा पती, सासू व सासरा हे बेकायदेशीररित्या मुंबईतून प्रवास करून गावी आले आहेत. मुंबईतील महिलेला कोरोना झाल्याचे गावी येणाऱ्या कुटुंबाला प्रवासात असताना माहिती मिळाली. हे कुटुंब रविवारी रात्री सोहोली गावात आले होते. त्यांना मळ्यात ठेवण्यात आले होते. ही माहिती मिळताच आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलून त्या चौघांना संस्थात्मक विलगिकरण केले.घटनास्थळी तहसिलदार शैलजा पाटील यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी परिसरात खबरदारीचे उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.








