औषध व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
राज्यातील काही औषध विक्रेते, त्यांचे कर्मचारी व परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच. परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही. याची खंत सर्व औषधी विक्रेते त्यांचे कर्मचारी यांच्या मनात असून ते सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
औषध संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दाखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाब लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे.







