या आंदोलनानेच आता सरकारला जाग येईल : आमदार गोपीचंद पडळकर
प्रतिनिधी / सांगली
ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे त्यांच्या हक्काचे आहे. पण तेच आरक्षण सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे रद्द झाले आहे. हे आरक्षण तात्काळ मिळावे या मागणीसाठी राज्यात सर्वत्र भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनानेच आता सरकारला जाग येईल असा इशारा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
सांगली शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात शनिवारी सकाळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेत्तृत्वाखाली भाजपाच्यावतीने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पडळकर यांनी सरकारला हा इशारा देण्यात आला.
पडळकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्यसरकारमुळे गोत्यात आले आहे. न्यायालयात 15 महिन्यात आठ वेळा केवळ पुढची तारीख मागून घेतली. मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही. जिल्हानिहाय सर्व्हेक्षण करून इम्पिरिकल डाटा सादर केला नाही. पदोन्नती आरक्षणही रद्द होण्यास राज्यसरकारही कारणीभूत आहे. आता ओबीसीचे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण हे सरकार घालवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात आता भाजपाने हे आंदोलन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारने ओबीसीच्या हक्काचे आरक्षण त्यांना मिळवून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी भाजपा नेत्या नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे, महापालिकेचे गटनेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, भाजपाचे प्रवक्ते मुन्ना कुरणे, युवा मोर्चाचे दीपक माने, विलास काळेबाग,यांच्यासह भाजपाच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








