प्रतिनिधी/सांगली
मिरज येथील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये मनपातर्फे उभारण्यात येणाऱया ऑक्सिजन प्लॅंट तसेच महिला व बालकल्याण समितीला `बायपास’ करुन चिल्ड्रन पार्क विकसीत करण्याच्या निर्णयाचा आज मंगळवारी स्थायी समिती सभेत फैसला होणार आहे.
स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. महापालिकेच्यावतीने मिरज येथे सुरु केलेल्या डेडीकेटेड कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लान्टचा निर्णय घेण्यात येऊनही निविदांच्या घोळात रखडला आहे. पुणे येथील एका कंपनीची 74 लाखांची निविदा आहे. मुदतवाढ देऊनही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एकच निविदा आल्याने प्लान्ट उभारणी व खर्चास मान्यतेचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण समितीला बायपास करुन चिल्ड्रन पार्क विकसीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावर महासभेत वादंग झाले होते. माजी महापौर गीता सुतार यांच्यासह महिला सदस्यांनी प्रशासनाच्या मनमानीवर ताशेरे ओढले होते. सुतार व सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांच्यामध्ये चकमकही उडाली होती. प्रशासन टार्गेट झाल्याने आयुक्तांनाही मिरच्या झोंबल्या होत्या. आयुक्तांनी उद्विग्न होत हा प्रकल्प रद्द करा, असे आवाहन सदस्यांना केले होते.
मात्र महिला सदस्यांच्या विरोधाला कात्रजचा घाट दाखवत प्रशासनाने नेमिनाथनर येथे चिल्ड्रेन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायीपुढे आणला आहे. भोपालच्या एका कंपनीची अंदाजपत्रकीय दरापेक्षा 13.10 टक्के कमी दराची निविदा मंजुरीसाठी ठेवली आहे. यावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणीपुरवठा देखभालीसाठी नवीन एजन्सी नियुक्तीपर्यंत गेल्यावर्षीच्या ठेकेदारास अंदाजपत्रकापेक्षा 1 टक्का कमी दराने काम करण्यास व खर्चास मान्यतेचा विषय तसेच महापालिका क्षेत्रातील रस्ते पॅचवर्क करण्यासाठी 54 लाखांचे दोन व्हायब्रेटर रोड रोलर खरेदीस मान्यता देण्याचा विषयही सभेपुढे आला आहे. याशिवाय 60 कोटी रुपयांच्या एलईडी पथदिव्यांच्या निविदापूर्व बैठकीमध्ये मक्तेदारांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे व दुरुस्त्या वेगवेगळ्या शुद्धीपत्रकान्वये प्रसिद्ध केलेल्या आहेत.
कोरे, आठवलेंचे अपील
लाचप्रकरणी निलंबित महापालिकेचे उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद कोरे यांचे अपील स्थायी समिती सभेपुढे आले आहे. त्यावर निर्णय होणार आहे. स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांच्यावरील वसुलीची कारवाई रद्दसंदर्भात दाखल केलेले अपील स्थायी समितीपुढे आले आहे. हे अपील अवलोकनी घेऊन निर्णय घेण्याचा विषय स्थायी समोर ठेवण्यात आला आहे.