आमदार सुधीर गाडगीळ यांची मदत; स्थानिक विकास निधीतून तरतूद
प्रतिनिधी / सांगली
सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील ऑक्सिजन निर्मिती प्लांट तसेच पाच व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची मदत केली आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून हा निधी दिला जाणार आहे. याबाबतचे पत्र आमदार गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहे. यावेळी भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार उपस्थित होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, ऑक्सिजन निर्मिती प्लांट व व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना पत्र दिले आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होऊन दोन्ही बाबींची पूर्तता होईल. त्यामुळे कोरोना बरोबरच इतर वेळीही गरजू रुग्णांना याचा फायदा होईल. तसेच पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात नवीन हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे त्यासाठी ही या ऑक्सिजन निर्मिती प्लांट व व्हेंटिलेटरचा उपयोग होईल.








