मालगांव येथील शेतकऱ्याची पोलिसात धाव
१० जणांवर गुन्हा, ऊसतोडणीसाठी येतो म्हणून पैसे उकळले
प्रतिनिधी / मिरज
तुमच्या शेतात ऊसतोडीसाठी येतो, असे सांगून दहा जणांच्या ऊसतोड टोळीने तालुक्यातील मालगांव येथील प्रविण कुबेर झळके (वय ३२) या शेतकऱ्याची तब्बल १४ लाख, ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सदर शेतकऱ्याने मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेऊन दहा ऊसतोड मजूरांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.
झळके यांच्या तक्रारीनुसार, परेश्वर रावजी अडे, रोहितदास तुकाराम जाधव, कृष्णा कैलास जाधव, गजानन धोंडू पवार, लक्ष्मण दलसिंग पवार, परमेश्वर लालसिंग राठोड, सुरेश उत्तम पवार, गणेश लालसिंग राठोड (सर्व रा. संक्राळा, ता. जितूर), विश्वंभर मारोत्तराव बीडगर रा. वडगांव, ता. परभणी) आणि नारायण शिवाजी राठोड (रा. ता. परभणी) या दहा जणांचा समावेश आहे. यातील आठ ऊसतोड मजूरांनी प्रत्येकी ७० हजार रुपये प्रमाणे पाच लाख, ६० हजार आणि विश्वंभर बीडगर व नारायण राठोड या दोघांनी नऊ लाख रुपये असे एकूण १४ लाख, ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे प्रविण झळके यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.








