प्रतिनिधी / विटा
मायणी रस्त्यावरील चिखलहोळ फाट्यानजीक ऊस तोड कामगारांची टोळी असणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या. या अपघातात ट्रॉलीमधील 25 जणांपैकी पाच जण जखमी झाले. त्यांना येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची विटा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, इस्लामपूरहून निघालेली ऊस तोड कामगारांची टोळी टेंभूर्णी येथील कारखान्याकडे निघाली होती. यावेळी मायणीमार्गे जात असताना या ट्रॅक्टरचा चिखलहोळ – माहुली रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरमधील सुमारे 25 लोकांपैकी 5 जण जखमी झाले आहेत. हे पाचही जखमी नांदेडच्या खंदार तालुक्यातील वहाद येथील रहिवासी आहेत.
चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यानंतर या ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉली जागेवर पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अमोल मुक्तीराम जाधव, राजू मुक्तीराम जाधव, मोहन पांडुरंग वाघमारे, मुरलीधर धोंडिबा जाधव, व्यंकटी निवृत्ती जाधव असे पाच जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर रुग्णवाहिका घेऊन आलेल्या अतुल शेटे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातातील दोन्ही ट्रोलीत मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजुरांची संख्या होती परंतु, या मोठ्या अपघातानंतरही सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.








