प्रतिनिधी / इस्लामपूर
कसलाच ‘सुराग’नसताना इस्लामपूर पोलीसांनी टीमवर्क व तंत्रशुध्द पध्दतीने तपास करुन येथील नेहरूनगरमधील राजेश सुभाष काळे (३५) याच्या खूनाचा छडा लावला. पोलीसांनी या खून प्रकरणी शहरातील तिघांना बुधवारी अटक केली. हे सर्व गुन्हेगार गुंड रवी खोत याच्या टोळीतील असून खिशातील पैशाची लूट करण्यासाठी आरोपींनी कापूसखेड रस्त्यालगत निर्जनस्थळी नेवून त्याला संपवल्याचे पुढे आले.
शहरातील ठिक-ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुसट दिसणाऱ्या दुचाकी वरुन या खूनाला वाचा फुटली.संदीप शिवाजी कुटे(२२,रा.लोणारगल्ली), ऋतिक दिनकर महापूरे(२१, रा.खांचेमळा), अनिल गणेश राठोड(२६ मुळ गाव ऐनापूर एल टी, ता.विजापूर, सध्या रा.लोणारगल्ली), अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. काळे याचा रविवारी रात्री लोखंडी रॉडने न दगडाने ठेचून खून करण्यात आला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह कापूसखेड रस्त्यालगत आढळून आल्यानंतर शहरात खळबळ उडाली.
सोमवार पासून पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीसांनी अथक परिश्रम घेवून हा खून उघडकीस आणला. घटनास्थळी केवळ मृताच्या काही वस्तु वगळता कसलाच सुराग नव्हता. पण पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींना अटक केली.