वार्ताहर / आष्टा
आष्टा नगरीच्या लोकप्रिय उपनगराध्यक्षा मनीषा प्रभाकर जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे सुपूर्द केला. यामुळे येथील उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले असून या जागेवर तेजश्री बोंडे आणि जगन्नाथ बसुगडे यांनी आपला हक्क सांगितला आहे. नामदार जयंतराव पाटील कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नामदार जयंतराव पाटील यांच्या सूचनेवरून आपण उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून भावी काळात नगरसेविका म्हणून प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच उपनगराध्यक्ष पदाच्या काळात नामदार जयंतराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, स्वर्गीय विलासरावजी शिंदे, आष्टा शहरातील दोन्ही गटाचे प्रमुख, सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांच्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. असेही मनीषा जाधव यांनी राजीनामा देतेवेळी सांगितले.
या पदासाठी आता तेजश्री बोंडे आणि जगन्नाथ बसुगडे हे इच्छुक आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहण्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.








