आर. आर. आबांचे स्वप्न पूर्ण : आमदार सुमनताई पाटील
प्रतिनिधी / कवठेमहांकाळ
संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातील शेती ओलीताखाली यावी, या विभागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन व्हावे, हे स्व. आर. आर. आबा यांचे स्वप्न होते. ढालगाव विभागात टेंभूचे पाणी येत आहे. त्यामुळे आबांचे आता स्वप्न सत्यात उतरले आहे. शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे, असे उद्गार आमदार सुमनताई पाटील यांनी काढले.
टेंभू योजनेच्या बानूरगड बोगद्यातून कवठेमहांकाळ तालुक्याकडे येणाऱ्या टेंभूच्या पाण्याची चाचणी सोमवारी घेण्यात आली. पाणी सोडण्याचा शुभारंभ आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कवठेमहांकाळच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजनेला स्व. आर. आर. आबा पाटील यांनी चालना देऊन शेतकऱयांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचे कार्य केले. त्यामुळे आज तासगावचा पूर्वभाग असो अथवा कवठेमहांकाळचा पश्चिमभाग असो, त्या ठिकाणी शेतकरी कष्ट करून सोने पिकवत आहेत. तो सुखी झाला आहे, असेही आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या.
कवठेमहांकाळच्या पूर्वभागात टेंभूचे पाणी आणणे हे आबांचे ध्येय होते. त्यामुळे आबांनी ढालगाव विभागात पाणी आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु आबांच्या निधनाने या योजनेला खो बसला होता. पण आपण जिद्द सोडली नाही. आज टेंभूचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि जयंतराव पाटील हे जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सिंचन योजना पूर्ण होतील असा विश्वासही आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी आले आहे. आता लवकरच या दोन नेत्यांच्या उपस्थितीत टेंभूचे पाणी सुरू करण्याचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष टी. व्ही. पाटील यांनी सांगितले.
टेंभू योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्याच्या कार्यक्रमाला अनिताताई सगरे, संजय हजारे, दत्ताजीराव पाटील, जगनाथ कोळेकर, एम. के. पाटील, अय्याज मुल्ला, चंद्रशेखर सगरे, दादासाहेब ढेरे, मोहन खोत, संदीप पाटील यांच्यासह टेंभूचे अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
करलहट्टीपर्यंत जाणार
टेंभू योजनेच्या बानूरगड बोगद्यातून कवठेमहांकाळ मुख्य कालव्यात हे पाणी येणार असून येथून सुमारे 36 किमी हे पाणी जाणार आहे. करलहट्टी या शेवटच्या गावापर्यंत हे पाणी जाणार आहे.








