पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जागेची पाहणी ः नऊ कोटींचा प्रस्ताव
प्रतिनिधीमिरज
सांगली, कुपवाड प्रमाणे मिरजेतही महापालिकेचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी किसान चौकालगत महापालिकेच्या रुग्णालय इमारतीची पाहणीही केली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी नउढ कोटी रुपयांचा प्रस्ताव असून, त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन देण्याची हमी त्यांनी दिली. या प्रभागातील नगरसेवक यासाठी पाठपुरावा करीत आहेत.
किसान चौकालगतच महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय अनेक वर्षे कार्यरत आहे. सध्या बाह्यरुग्ण आणि प्रसूती विभाग कार्यरत आहे. सांगली आणि कुपवाडमध्ये महापालिका स्वतःच्या मालकीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारत आहे. तशाच पद्धतीचे हॉस्पिटल मिरजेतही व्हावे, यासाठी प्रभाग सातमधील नगरसेवक, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, डॉ. नर्गिस सय्यद, अतहर नायकवडी आणि आझम काझी यांनी पाठपुरावा सुरू केला होता. या रुग्णालयाची इमारत ऐतिहासिक असून, त्याचा परिसरही मोठा आहे. या ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त भव्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यास त्याचा शहर आणि ग्रामीण भागासह कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. त्यासाठी या नगरसेवकांकडून सतत पाठपुरावा सुरू होता.
सध्या महापालिकेने कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला प्राधान्य दिले आहे. रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यादृष्टीने कुपवाड आणि मिरजेतील जागेची पाहणीही केली. त्यांच्यासमवेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे गटनेते, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, डॉ. नर्गिस सय्यद, अतहर नायकवडी, आझम काझी, माजी महापौर इद्रीस नायकवडी, आयुक्त नितीन कापडणीस यांसह अनेकजण उपस्थित होते.
डॉ. नर्गिस सय्यद यांनी ही जागा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दृष्टीने कशी योग्य आहे, याची मा†िहती जयंत पाटील यांना दिली. सध्या खासगी रुग्णालयाचे दर भरमसाठ वाढले आहेत. सर्वसामान्यांना हे दर परवाडणारे नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी महापालिकेचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आधारवड ठरेल, असे स्पष्ट केले. सध्या असलेल्या रुग्णालयाच्या दर्शनी बाजूमध्ये कोणताही बदल न करता मागील बाजूस भव्य हॉस्पिटल उभारण्याच्या दृष्टीने ठरावही करण्यात आला आहे. नऊ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.
आश्वासनामुळे आशा पल्लवीत
पाटील यांनी संपूर्ण जागेची पाहणी केल्यानंतर तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या. शासन दरबारी पाठपुरावा करुन लवकरच मान्यता मिळवून देऊ, अशी हमीही त्यांनी दिली. पाटील यांच्या आश्वासनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आमच्या पाठपुराव्याला यश येऊन येथे भव्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे गटनेते मैनुद्दीन बागवान आणि डॉ. नर्गिस सय्यद यांनी स्पष्ट केले.