आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सौदे बाजारात डाळींबाला मंगळवारी प्रति किलो 255 रुपये इतका दर मिळाला. चालू हंगामातील हा दर उच्चांकी ठरला. मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सच्या अडतीमध्ये सांगोला तालुक्यातील येथील शेतकरी सचिन यांच्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला हा दर मिळाला. तर त्या खालोखाल दुसऱ्या पतीच्या डाळिंबाला 160 रुपये प्रति किलो दर मिळाला. बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी चालू हंगामात हा दर सर्वोच्च असल्याचे सांगितले.
गतवर्षी झालेली अतिवृष्टी, चालू वर्षी सतत झालेला पाऊस, तेल्या, मर रोगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे डाळींब संकटात सापडले आहे. त्यातच कोरोना, लॉकडाऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. शिवाय त्यामुळेही डाळिंब विक्रीला गती मिळत आहे. त्यामुळे हा दर येणाऱ्या कालावधीत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.








