सरकारचा निषेध
“ढोल बजाव-सरकार जगाव”ला सवर्त्र प्रतिसाद
प्रतिनिधी / आटपाडी
धनगर समाजाला एसटी चे आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी छेडलेले “ढोल बजाव-सरकार जगाव” आंदोलन आटपाडी तालुक्यात गावोगावी करण्यात आले. धनगर समाज असलेल्या सर्व गावात हे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.
सांगली जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. माजी उपसभापती तानाजी यमगर, प्रभाकर पुजारी, जयवंत सरगर, विष्णू अर्जुन यांच्यासह आमदार पडळकर समर्थकांनी अण्णाभाऊ साठे चौकात रिंगण करून ढोल वाजविले. धनगर समाजातील आबालवृद्ध यात सहभागी झाले.
तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देऊन धनगर समाज आरक्षण प्रश्नी दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, निंबवडेसह धनगर समाज असलेल्या विविध गावात मंदिर, ग्रामपंचायत समोर समाज बांधवांनी ढोल वाजविले.








