सावत्र भावाने तक्रार केल्याने कौटुंबिक वादाची राजकीय चर्चा
दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या कडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार त्यांचे सावत्र बंधू बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात संरक्षण देण्याची मागणी देखील बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या राजकारणात कौटुंबिक वादाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की दिवंगत नेते धोंडीसाहेब देशमुख यांच्या पश्चात आम्हा भावंडांना तुच्छतेची वागणूक देऊन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मी वडिलार्जित हिस्सा मागितल्यास मला व माझ्या आई ला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याची व जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. वारसा हक्काची मालमत्ता मिळावी म्हणून आटपाडी कोर्टामध्ये याबाबत मी दावा केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व कुटुंबीयांकडून तसेच जवळचे मित्रांकडून मोठा दबाव येण्याची शक्यता असून माझ्या व आईच्या जीवितास त्यांच्या कडून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच खोटी प्रतिष्ठा व राजकीय हव्यासापोटी त्यांनी आम्हाला जगासमोर येण्यासाठी अटकाव केला होता परंतु आर्थिक उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसल्याने मला व माझ्या आईवर भीक मागण्याची पाळी आली आहे.त्यामुळे आम्ही वारसाने आमच्या हक्काचे मालमत्ता मिळविण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला आहे.
तसेच सदर कोर्टाचा निकाल लागेपर्यंत माझ्या व माझ्या आईच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंत राव देशमुख यांच्यावर राहील असे निवेदनात म्हटले आहे. हनुमंत राव देशमुख यांचे राजकीय वलय पाहता जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.








