आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होणार आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे. याकामी २१ कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर आता आटपाडीमध्ये उपचार शक्य होणार आहेत.
आमदार अनिलभाऊ बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून आटपाडीला उपजिल्हा रुग्णालय तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती. कोरोना काळात सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आटपाडी ला उपजिल्हा रुग्णालय तातडीने मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे २१ कोटी ६२ लाख रुपयांच्या आटपाडी उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी जि प सदस्य तानाजीराव पाटील यांनी दिली.








