पदाधिकारी बदलास इच्छुकांची मात्र जोरदार उपस्थिती
प्रतिनिधी / सांगली
जिल्हा परिषद सरपंच कार्यशाळा व रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरेंसह भाजपने बहिष्कार घातला. पदाधिकारी बदलाची मागणी असणारे भाजप सदस्य मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होऊन व्यासपीठावर विराजमान झाले होते.
पालकमंत्री जयंतराव पाटील व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले. दीपप्रज्वलन करून सरपंच कार्यशाळा सुरू करण्यात आली. आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, काँग्रेसचे गटनेते जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी गटनेते शरद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक शिक्षण व आरोग्य समिती सभासद आशा पाटील (अजितराव घोरपडे गट) यांनी केले. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेने केलेले काम व उपाययोजना बाबत माहिती दिली. सीईओ डुडी यांनी सरपंच कार्यशाळेबाबत माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ग्राम दक्षता समितीने काय दक्षता घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर माहिती दिली.








