महापौरांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ; घरपट्टी भरण्यासाठीही क्यूआर कोड उपलब्ध करून देणार
प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अवघ्या पाच मिनिटात अन पाच रुपयात जन्म -मृत्यूचे दाखले मिळणार आहेत. त्यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान प्रशासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. घरपट्टी भरण्यासाठीही नागरिकांना क्यूआर कोड उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी उपमहापौर उमेश पाटील, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे , राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, शेखर माने, नगरसचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते. आजपासून ऑनलाईन दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता कोणत्याही नागरिकाला दाखला काढण्यासाठी महापालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. घरबसल्या ५ मिनिटात दाखले उपलब्ध होणार आहेत, असे आयुक्त कापडणीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.








