गुडघाभर पाण्यात कणसे तोडण्याची वेळ, पाऊसाने पिके उध्वस्त
वार्ताहर / दिघंची
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊसाने दिघंची व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजरी, मका, ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या अन्नात पाणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी देखील केली आहे.
उंबरगाव येथील काही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये गुडघा एवढे पाणी साचले आहे. तर काही ठिकणी गुडघ्यापेक्षा जास्त उंचीएवढे पाणी पिकांमध्ये पाणी साचलेले आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकरी हा नेहमी संघर्ष करणारा शेतकरी आहे. येथील शेतकरी जनार्धन मुरलीधर ठोंबरे या शेतकऱ्याने हार न मानता गुडघा भर पाण्यात उभे राहून बाजरीची कणसे तोडून ती ट्रॅक्टरमधून शेताच्या बाहेर काढली. कष्टाने पिकवलेली शेती पाऊसाने मातीमोल केल्याचे दुःख शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने मदत करावी अशी मागणी करत आहेत.
आटपाडी तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध आहे.दुष्काळावर मात करून या भागातील शेतकरी आपली शेती पिकवतो. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी मका, बाजरी, ऊस आदी पिके जोमाने आली परंतु अवकाळीने शेवटी शेतकऱ्यांच्या शेतीवर घाला घातलाच. हाता तोंडाला आलेली पिके वाया गेली. जी पिके आहेत ती वाचवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. एकंदारीत अवकाळीने शेतकऱ्यांच्या अन्नात पाणी कालवले हे खरं. त्यामुळे पाण्यातील वाया गेलेली पीके बघण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे.








