१० किलोमिटर नॉनस्टॉप केले रनिंग
प्रतिनिधी / आटपाडी
अवघे ५६ वर्षे वय असलेल्या व्यायामप्रिय तरुण नेतृत्वाने १० किलोमिटर नॉनस्टॉप रनिंग करत कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी तरुणाईला अनोखा संदेश दिला. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी कोरोना रोगाचा फैलाव वाढत असताना अनेक तरुणांना त्यांची लागण होत असुन अशा तरुणांना बेडची गरज भासु नये यासाठी तुम्ही मैदानात उतरा आणि कसरत करा असा संदेश कृतीतुन दिला.
आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, दि.बाबासाहेब देशमुख बँकेचे संस्थापक, सांगली जिल्ला परिषदेचे माजी अध्यक्ष अशा अनेक भूमिका निभावत राजकारण, सहकार, शिक्षण, कला-क्रिडा-साहित्य क्षेत्रात अमरसिंह देशमुख यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. व्यायामाची विशेष आवड असणारे अमरसिंह देशमुख यांनी गुरुवारी सलग १० किलोमिटर धावत आरोग्यासाठी मैदानात उतरा, असे आवाहन तरुणांना केले.
देशात आणि जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेकांचा बळी जात आहे. बेड अभावी अनेकांचे हाल होत आहेत. अशा स्थितीत ५० वर्ष वयापर्यंतच्या सर्वांनीच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी आपल्याला बेडची गरज लागु नये म्हणुन व्यायामाला गती द्यावी, असे आवाहन अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. त्यासाठी स्वतः सलग दहा किलो मिटर अंतर १ तास २५ मिनिटांमध्ये पुर्ण केले.
आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे अमरसिंह देशमुख यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन मैदानावर येवुन व्यायामाला प्राधान्य द्या, असे आवाहन केले. आजच्या तरूनाना रुग्णालयात बेडची गरज लागु नये इतके तुमचे शरीर आणि मन कणखर बनले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तरुणांना जर बेडची गरज लागली तर वयोवृध्दांचे काय? असा सवालदेखील ते उपस्थित करतात.
‘हम फिट तो इंडिया फिट’ ही प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे. कोरोनाचे संकट गंभीर असताना आरोग्य व्यवस्थेवर आपण समस्या बनु नये . व्यायाम करून, घाम गाळून मी कोरोनाला हरवणार ही उर्जा अंगी बाळगा, असे आवाहन करत या ५६ वर्षी तरुण नेतृत्त्वाने सर्वांनाच मावनिक साद घालत वस्तुस्थितीच्या नजीक नेण्याचे अनुकरणीय काम केले आहे. दोन वर्षापुर्वी अमरसिंह देशमुख यांनी सहकाऱ्यासह आटपाडी ते दिघंची व दिघंची ते आटपाडी असा नॉनस्टॉप धावण्याचीही कामगिरी नोंदविली होती.








