दोन महिने पाण्यासाठी वणवण, दहा दिवसात पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन
प्रतिनिधी / मिरज
शहरातील प्रभाग सातमध्ये समतानगर भागात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण होऊनही पाणी मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी सोमवारी महापालिका पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन केले. माजी महापौर संगीत खोत यांनी या आंदोलनकर्त्यांना पाठींबा देऊन दहा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
माजी महापौर संगीत खोत यांनी या आंदोलनात सहभागी होत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला. मागणीचे निवेदन दिले. दहा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संगीत खोत यांनी दिला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.








