भाजपच्या सहा नगरसेवकांचा समावेश ः विभागीय आयुक्तांकडून नोटीस
प्रतिनिधी/सांगली
महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षीय आदेश डावलून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याप्रकरणी भाजपाच्या सहा नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी येत्या मंगळवारी (5 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे. याबाबतची नोटीस सहा सदस्यांना बजाविण्यात आली आहे. सुनावणीस पुराव्यासह उपस्थित रहा, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असे या नोटीसेमध्ये म्हटले आहे.
या सदस्यांमध्ये अपर्णा कदम, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणामुळे दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली होती. त्यामुळे यावेळी तरी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
23 फेबुवारी रोजी ही निवडणूक झाली होती. भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर गजानन मगदूम यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौर तर उपमहापौर पदासाठी उमेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. मतदानापूर्वी भाजप गटनेते विनायक सिंहासने यांनी सर्व सदस्यांना पक्षीय आदेश बजावत भाजपच्याच अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मतदान प्रक्रियेत अपर्णा कदम, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक व सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले होते. तर आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता.
परिणामी बहुमत असतानाही भाजपचा पराभव झाला होता. यानंतर फुटीर सदस्यांना अपात्र करण्यासाठी भाजपने कंबर कसली हेती. सहयोगी सदस्य असल्याने विजय घाडगे यांना अपात्रतेच्या प्रस्तावातून वगळले आहे. तर अपर्णा कदम, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे यांच्या अपात्रतेचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत.
दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव 10 ऑगस्ट रोजीची सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यान आता पुन्हा मंगळवारी 05 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता विभागीय आयुक्तांच्या दालनामध्ये सुनावणी आहे. याबाबतची नोटीस सहा सदस्यांना बजावली आहे. सुनावणीस स्वतः अथवा कायदेशीर प्रतिनीधीमार्फत पुराव्याच्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. आपण अनुपस्थित राहिल्यास, याप्रकरणी आपणास आपणास काहीही एक सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे.
सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
महापौर, उमहापौर निवडणुकीत सात सदस्यांनी दगा केल्याने भाजपला महापालिकेची सत्ता सोडावी लागली. यामध्ये एका सहयोगी सदस्याचा समावेश होता, याची सल नेत्यांना आहे. त्यामुळेच या सदस्यांना अपात्र करण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. सदस्यांच्या विरोधात सर्व आवश्यक पुरावे विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत. अखेर मंगळवारी सुनावणीस मुहूर्त लागला असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








