प्रतिनिधी/मिरज
सांगली-मिरज रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपरचालक उत्तम महेंद्र सिंग (वय 45, रा. शांतीनगर, एसपी मार्ग, मुंबई, मुळ गांव बेहरामपूर, गुरूदारपूर, पंजाब) याच्यावर महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या तरुणाची रात्री उशिराने ओळख पटली असून, शाहबाज नदीम शेख (वय 29, रा. शास्त्री चौक, सहारा कॉलनी, मिरज) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल, सोमवारी सायंकाळच्या सुमारास शाहबाज शेख हा आपल्या दुचाकीवरुन सांगलीच्या दिशेने निघाला होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या 14 चाकी डंपर (एनएल-01-एसी-2594) ने शाहबाजच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात शाहबाज याच्या अंगावरुन 14 चाकी डंपर गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर डंपर चालक उत्तम महेंद्र सिंग हा फरार झाला होता. मयत तरुणाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तो शास्त्री चौकातील सहारा कॉलनी येथे राहणारा असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. मयत शाहबाज याचा भाऊ अरबाज नदीम शेख (वय 22) याने महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली.
अपघातानंतर फरार झालेल्या डंपर चालकाला रात्री उशिराने अटक करण्यात आली. सांगलीच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक उत्तम महेंद्रसिंग याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Previous Articleकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता ‘RTPCR’ सक्ती नाही
Next Article साताऱ्यात ट्रक अपघातात एकाचा मृत्यू








