तासगाव, इस्लामपूर, शिराळा, विटा, आटपाडी, पलूस समितीची मुदत पूर्ण
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाच्या महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सहकार प्राधिकरणने या निवडणुका तीन महिन्यात पार पाडण्याचे आदेश दिल्यानुसार सांगली बाजार समितीसह जिह्यातील सात समित्यांची निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे.
पंधरा दिवसापूर्वी शासनाने सहकारी संस्थांमधील स्थगिती उठवत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. ज्या सहकारी संस्थांची अर्ज विक्री सुरु होती, त्यांच्या निवडणुका तत्काळ होतील. पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्या बाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागून होते.
अखेर राज्यातील 258 बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे. यापूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका पणन मंडळाच्या अखत्यारीत होत असे. मात्र यावेळी बदल केला असून सहकार प्राधिकरण ही प्रकिया राबवणार आहे. प्राधिकरणला प्राप्त झालेल्या या आदेशामुळे सांगली बाजार समितीसह तासगाव, इस्लामपूर, शिराळा, पलूस, विटा व आटपाडी या समितींचा निवडणूक कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होणार आहे. तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. परंतु त्यांना या कालावधीमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसेल.
दरम्यान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वर्षाला सुमारे दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. बाजार समितीची मोठी उलाढाल असल्याने सर्व राजकीय पक्षांना ही बाजार समिती आपल्याकडे असावी, यासाठी प्रयत्न असतो. यावेळी आघाडीच होण्याची शक्यता आहे.