लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी, नवदाम्पत्यांसाठी ही सेट उपलब्ध
सांगली : प्रतिनिधी
इंग्रजी नववर्षातील पण पहिलाच मराठमोळा सण म्हणजे मकर संक्रांत १४ जानेवारीला असणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाजारात काटेरी हलव्याचे तयार दागिने बाजारात पहायला मिळत आहेत. देखण्या सुबक नक्षीदार या कलात्मक दागिन्यांनी मारुती चौक परिसरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने सजवलेली आहेत.
यानिमित्ताने पाच वर्षातील लहान मुलांना बोरन्हाणसाठी या दागिन्यांचा वापर करतात. बालक रडू नये, तसेच त्याचा उत्कर्ष व्हावा, त्याला पिडा होवू नये, या श्र-द्धेतून ही परंपरा जोपासली जाते. नववधूसाठी व जावयांसाठीही वाण देण्यासाठी, हे दागिने वापरतात. काटेरी हलव्यांचे दागिने घालून फोटोही काढले जातात. ही परंपरा आता सर्वच समाजात दिसून येत आहे. संक्रांतीचा हलवा हा ओबडधोबड असतो व तो दोरीत ओवताना फुटण्याची शक्यता असते, तसेच त्याचे दागिने उठावदार दिसत नाहीत, म्हणून हलव्याचे दागिने हे काटेरी रंगिबेरंगी हलव्यांपासूनच बनवले जातात त्यामुळे ते सुबक, कलात्मक व देखणे दिसतात.
यात लहान बालक, नववधू व जावई अशा तीनही प्रकारात सेट मिळतात. बालकांसाठी श्रीकृष्ण सेट असून, किरीट, बाजूबंद, हार, मनगटी, बासरी, अंगठी, आदींचा समावेश आहे. १०० ते १००० रुपयांपर्यंत हे सेट आहेत. नववधूंच्या सेटमध्ये किरीट, बिंदी, अंगठी, नथ, बाजूबंद, तन्मणी, नेकलेस, तोडे, झुब्बे, व्हील, बुगडी, शाहीहार, मंगळसुत्र, कमरपट्टा छल्ला, बांगडीजोड असे प्रकार तर जावयांसाठी शाहीहार, गुच्छ, घड्याळ, मोबाईल, अंगठी, गोण्यांनी सजवलेला हत्ती, आदी प्रकार आहेत. याचे दर ४०० ते ५०० पासून पुढे आहेत. तसेच तीळवडी, तिळलाडू, गुळपोळी, हलवा आदीसुद्धा विक्रीस उपलब्ध आहेत.