सांगली / प्रतिनिधी:
सांगली शहरात आज सकाळपासूनच संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. विनाकारण कोणीही बाहेर फिरणार नाही याची काळजी पोलिसांच्याकडून घेण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात रस्त्यावर वर्दळ होती, मात्र पोलिसांनी आक्रमक भूमिका घेताच दुपारनंतर नागरिकांची वर्दळ कमी आली.
जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस प्रमुख मनीषा दुबुले स्वतः फौंज फाट्यासह रस्त्यावर उतरले होते. शहरातील कॉलेज कॉर्नर, स्टेशन चौक, विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, एसटी स्टँड चौक, शंभर फुटी रोड, आमराई चौक, राजवाडा चौक आदी परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. स्वतः पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस प्रमुख मनीषा दुबुले रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरातून फेरफटका मारून पोलीस प्रमुखांनी संचारबंदीची पाहणी केली. प्रत्येक चौकात वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तू, साहित्यांची दुकाने बंद होती. त्यामुळे प्रमुख बाजार पेठेत शुकशुकाट होता. मारुती रस्त्यावर थोडीफार वर्दळ पाहायला मिळत होती तिही दुपारनंतर कमी झाली.








