प्रतिनिधी / सांगली
सध्या लॉकडाऊननंतर लग्नसराईचा धूम धडाका सुरू आहे. अशातच शहरातील संजयनगर येथे चक्क कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा पार पडला. संजयनगर येथील विलास गगणे यांच्या कुटुंबीयांनी या श्वानाचे लग्न धुमधडाक्यात लावून प्राणीप्रेमाचे दर्शन घडवलं. संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं (डॉली आणि टायगर) लग्न धुमधडाक्यात लावून त्यांचे प्राणी प्रेमाचे दर्शन घडविले. हा लग्नसोहळा शासनाच्या नियमानुसार पार पडल्याची चर्चा परिसरात आहे.
गेले 9 महिने लॉकडाऊनमुळे अनेक विवाहेच्छूक मुलामुलींची लग्ने लांबली होती. गेले महिनाभर लग्नसराईची धूम सुरू आहे. अशातच सांगलीतील अक्काताई गगणे कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून प्राण्यावरील आपल्या प्रेमाचे दर्शन घडवलं.
या लग्नसोहळ्यात पन्नास नागरिक उपस्थित होते. भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या घरातल्या, मित्रांच्या किंवा एकूणच माणसांच्या लग्नात जे-जे होतं, ते सगळं या कुत्रा-कुत्रीच्या लग्नात करण्यात आलं. अगदी, ‘आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं..’ अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रु नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं.. त्यात मानपान, आहेर, रुखवत हेही आलं बरं..
चिरंजीव टायगर आणि ‘चि.सौ.कां. डॉली’ या दोघांचा साखरपुडाही थाटात झाला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणच आलं होतं. फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. या वरातीत सर्वजण संगीताच्या तालावर नाचत होते. डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. टायगरला रुबाबदार दिसत होता. मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. सर्वांच्या जेवणानंतर विदाई सुद्धा पार पडली.
या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे. यावेळी विशाल कांबळे, विलास गगणे,आक्काताई गगणे, दिपाजंली गगणे, महेश भोरकडे आदी उपस्थित होते.