मृत माकडाचा केला विधिवत अंत्यविधी
प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे बदली कर्मचारी श्रीराम सासणे व प्रभाग मुकादम नागेश मद्रासी यांनी नुकतेच माणुसकीचे दर्शन घडविले. अपघातात मरण पावलेल्या एका माकडाचा त्यांनी विधिवत अंत्यविधी करुन आपली मानवता जपली.
मनपा प्रभाग क्रमांक १९ वानलेसवाडी येथे रस्त्याकडेला गाडीला धडकून एक माकड मेले होते. यावेळी प्रभागातील बदली कर्मचारी श्रीराम सासणे हे कामावरती जात होते. त्यांना ते माकड मेल्याचे समजताच त्यांनी मुकादम नागेश मद्रासी यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आरोग्याधिकारी ताटे यांना कळवले असता, त्यांनी वरिष्ठ निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सूचना केली.
त्यानुसार पाटणकर यांच्या आदेशाने प्रभागातील निरीक्षक श्रीकांत मद्रासी, नगरसेविका व प्रभाग समिती दोनच्या सभापती अप्सरा वायदंडे यांनी व मनपा कर्मचारी या सर्वांनी मिळून बानलेसवाडी येथील हनुमान मंदिराच्या पिछाडीस त्या माकडाचे विधीवत अंत्यविधी पूर्ण केला.
यावेळी महेंद्र वायदंडे, कर्मचारी नितीन अवसरे, विशाल कांबळे, दादासो कांबळे, विकी मुळके यांच्यासह भागातील सर्व नागरिक उपस्थित होते. सदर विधी झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक पाटणकर व आरोग्य अधिकारी डॉ. ताटे यांनी सासणे व मद्रासी यांचे कौतुक करत या मनपा कर्मचाऱ्यांचे काम अभिनंदनीय असल्याचे आवर्जून सांगितले.








