तर गैरहजरपैकी १४ कर्मचारी कामावर रुजू
प्रतिनिधी / सांगली
एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा महिन्याहून अधिक काळ संप सुरु आहे. सोमवारी कामावर हजर होण्यासाठी राज्यशासनाने अल्टीमेटम दिला होता. पण त्याला भिक न घालता अनेक कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम होते. सांगली जिल्ह्यातील दहाही डेपो मिळून आजवर ८२३ निलंबित झाले आहेत, त्यापैकी फक्त २९ कर्मचारीच सोमवारी कामावर परतले. तर गैरहजर असलेल्या ५० टक्के कर्मचाऱ्यांपैकी फक्त १४ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले असल्याचे सांगली विभागातून सांगण्यात आले.
राज्यशासनाने दिलेला वेतनवाढीचा निर्णय अमान्य करत एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. सध्या सांगली एसटी विभागात ५० टक्के कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. प्रशासनाने कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही अजूनही फक्त ५० टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली विभागातील ४ हजार २७ कर्मचाऱ्यांपैकी फक्त २००० च्या आसपास कर्मचारी सध्या कामावर उपस्थित आहेत. संपात सहभागी झाल्याबद्दल प – शासनाकडून गेले काही दिवस कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आजअखेर सांगली जिल्ह्यातील ८२३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सोमवारी कामावर हजर होण्यासाठी राज्यशासनाने अल्टीमेटम दिल्याने ८२३ कर्मचाऱ्यांपैकी २९ कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्यात आले आहे. तर आजअखेर ११६ जणांना कामावरुन बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच गैरहजरपैकी १४ कर्मचारी सोमवारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. या कर्मचाऱ्यांकरवी सोमवारी ३१३ गाड्यांच्या फेन्या झाल्या.
चौकट विभागांतर्गत बदल्याने कर्मचारी संतप्त, मागच्या आठवड्यात रजेवर असलेल्या आणि कायमस्वरुपी रजेवर असलेल्या काही कर्मचाऱ्यांवर विभागांर्तगत बदल्या करण्यात आल्या आहेत. आगार व्यवस्थापकांच्या अतंर्गत वादामुळे मनमानी कारभार सुरु असून, ज्यांचा संपाशी संबंध नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याची व आगार व्यवस्थापक हे विभाग नियंत्रकांना चुकीची माहिती देत असल्याचीही तक्रार काही संतप्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.








